दारासमोर झाड लावून गणेशमूर्तीचे विसर्जन करा; गणेशरूपी वृक्षदेवतेची स्थापना करा ; पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा संदेश- डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी/उज्वला बागुल) : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांचा उत्सव आहे. मात्र, गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतरही श्री गणरायाचा आशीर्वाद आपल्या घरात आणि जीवनात कायम राहावा, यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची गरज आहे. त्यासाठी दारासमोर दीर्घकाळ टिकणारे झाड लावून त्या ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन करावे आणि गणेशरूपी वृक्षदेवतेची कायमस्वरूपी स्थापना करावी, असे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे.

यंदा शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून, या दिवशी घरोघरी विराजमान असलेल्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. १४ सप्टेंबरपासून घराघरांत विराजमान झालेल्या सुखकर्ता, दुःखहर्ता आणि विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी पर्यावरणपूरक विसर्जनाचा संदेश दिला आहे.

रिद्धी-सिद्धीचा आशीर्वाद कायम राहावा

श्री गणेशाला रिद्धी-सिद्धीचे अधिष्ठान मानले जाते. रिद्धीमुळे जीवनात सुख-समृद्धी, यश, ऐश्वर्य आणि धनधान्याची भरभराट होते, तर सिद्धीमुळे कार्यात पूर्णत्व, योग्य बुद्धी, ज्ञान, शांतता आणि अलौकिक क्षमता प्राप्त होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. गणराया भक्तांच्या जीवनातील विघ्न आणि दुःख दूर करून योग्य दिशा दाखवतो, अशी धार्मिक भावना आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करताना पर्यावरणाचेही भान राखणे आवश्यक आहे. त्यामुळे घराच्या दारासमोर जागा उपलब्ध असल्यास तेथे एखादे दीर्घकाळ टिकणारे झाड लावावे आणि त्याच्या सान्निध्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. यामुळे मूर्तीची विटंबना होण्याचा प्रश्न टाळता येईल आणि त्याचबरोबर वृक्षाच्या रूपाने गणेशाची आठवण कायमस्वरूपी जपता येईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

घराबाहेर पडताना गणेशरूपी वृक्षाचे दर्शन

दारासमोर लावलेले हे झाड भविष्यात वाढत असताना घरातील प्रत्येक सदस्याला त्याचे दर्शन होईल. घराबाहेर पडताना सर्वप्रथम गणेशरूपी वृक्षाचे दर्शन झाल्याने सकारात्मक भावना निर्माण होण्यास आणि आपल्या कामाला योग्य दिशा मिळण्यास मदत होईल, अशी संकल्पना डॉ. पाटील यांनी मांडली.

वृक्षारोपणामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच घराच्या परिसरात हिरवाई वाढेल. गणेशोत्सवातून भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम या उपक्रमातून होऊ शकते.

जागा नसल्यास घरच्या घरी विसर्जनाचा पर्याय

ज्या नागरिकांकडे घरासमोर झाड लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही, त्यांनी घरच्या घरी गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करून त्यातून मिळालेली माती दीर्घकाळ टिकणाऱ्या झाडांच्या मुळाशी विसर्जित करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

तसेच कुंडीमध्ये गणेशमूर्तीच्या विसर्जनातून मिळालेल्या मातीचा वापर करून बियांचे रोपण करावे आणि रोप तयार झाल्यानंतर पुढील वर्षी योग्य ठिकाणी त्याची लागवड करावी, अथवा उपलब्ध योग्य जागेत तत्काळ वृक्षारोपण करावे. अशा पद्धतीने गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरवता येईल.

भक्तीबरोबर पर्यावरण संवर्धनाची जोड

गणेशोत्सवातील श्रद्धा आणि परंपरा जपत पर्यावरणाचे रक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. ‘गणेशमूर्तीचे विसर्जन आणि वृक्षाची निर्मिती’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचल्यास गणेशोत्सवाला पर्यावरण संवर्धनाची सकारात्मक जोड मिळेल. प्रत्येक कुटुंबाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने किमान एका झाडाची लागवड करून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे.