भुसावळ (प्रतिनिधी) : येथील गंगाराम प्लॉट परिसरातील भवानी पेठ येथे राहणाऱ्या खिलेश्वरी सोनार, प्रांजल सोनार आणि रोमा सोनार या तीन सख्ख्या बहिणींनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा आगळावेगळा संदेश दिला आहे. तिन्ही भगिनींनी एकत्रितपणे गाईच्या शुद्ध शेणापासून आकर्षक गणेशमूर्ती साकारली असून, त्यांच्या या अनोख्या कलाकृतीची शहरात चर्चा रंगली आहे. स्वर्गातून बाप्पाचे आगमन सोनार भगिनींनी केवळ गणेशमूर्ती साकारून न थांबता तिच्याभोवती आकर्षक आरासही उभी केली आहे. जणू स्वर्गातून गणराय पृथ्वीवर अवतरत आहेत, असा मनोहारी देखावा त्यांनी साकारला आहे. हा देखावा अधिक जिवंत भासावा यासाठी कापसाचा वापर करून पांढरे शुभ्र ढग तयार करण्यात आले आहेत. टाकाऊतून टिकाऊचा संदेश या संपूर्ण सजावटीत पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळण्यात आला आहे. गणरायाच्या हातातील नाजूक कमळाचे फूल मातीपासून तयार करण्यात आले आहे. तसेच बाप्पाचे वाहन असलेला उंदीर आणि आकर्षक रथ तयार करण्यासाठी टाकाऊ कागदापासून तयार केलेल्या पेपर पल्पचा वापर करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक साहित्याचा कल्पक वापर करून साकारलेली ही कलाकृती गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. सोनार भगिनींच्या कलाकुसरीचे आणि पर्यावरणपूरक संकल्पनेचे नागरिकांकडून कौतुक होत असून, हा विलोभनीय देखावा पाहण्यासाठी भुसावळकर मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी भेट देत आहेत. फोटो कॅप्शन : स्वर्गातून बाप्पाचे आगमन... सोनार भगिनींनी साकारलेला आकर्षक पर्यावरणपूरक देखावा.



