भुसावळ (प्रतिनिधी) - येथील पु. ओं. नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. ‘ऑनलाइन शिक्षण पद्धती: योग्य की अयोग्य?’ या अत्यंत समकालीन आणि महत्त्वाच्या विषयावर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले विचार अतिशय प्रभावीपणे मांडले. या स्पर्धेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री बी. एच. बऱ्हाटे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रमा मसाने यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती चेअरमन सौ. ज्योती पाटील यांनी केले. त्यांनी आजच्या डिजिटल युगात शिक्षणाचे बदलणारे स्वरूप आणि त्याचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. स्पर्धेला दोन गट पाडण्यात आले होते—एक गट ऑनलाइन शिक्षणाच्या बाजूने (योग्य) आणि दुसरा गट त्याविरुद्ध (अयोग्य) बाजू मांडत होता.ऑनलाइन शिक्षणाच्या बाजूने बोलताना विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की, ऑनलाइन पद्धतीमुळे शिक्षण अधिक सुलभ, लवचिक आणि आधुनिक झाले आहे. घरबसल्या जागतिक दर्जाचे ज्ञान मिळवणे यामुळे शक्य झाले असून, वेळेची आणि पैशांची मोठी बचत होते. कोरोना काळातील शैक्षणिक खंड ऑनलाइन शिक्षणामुळेच भरून निघाला, असा युक्तिवाद विद्यार्थ्यांनी केला.तर विरुद्ध बाजू मांडणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणातील त्रुटींवर बोट ठेवले. सतत स्क्रीनसमोर बसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर, विशेषतः डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम त्यांनी मांडले. तसेच, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील सामाजिक संवाद कमी होत असून, प्रत्यक्ष वर्गात मिळणारे संस्कार आणि शिस्त यापासून विद्यार्थी वंचित राहत असल्याचा दावा त्यांनी केला. ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना येणाऱ्या अडचणींवरही विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. सौ. कुंदा चौधरी, प्रा. एन. झेड. रत्नपारखी, प्रा. एन. पी. निळे यांनी केले. दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढत अतिशय आक्रमक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने आपली मते मांडली. स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:प्रथम क्रमांक: अन्वी प्रांजल नेवे (इ. 11 वी, विज्ञान), द्वितीय क्रमांक: वारुणी कुंदन पाटील (इ. 11 वी,विज्ञान) , तृतीय क्रमांक: यशश्री राजेंद्र चव्हाण ( इ. 11वी विज्ञान) उत्तेजनार्थ : सोनल किरण राणे ( इ.11वी विज्ञान). शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बऱ्हाटे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणतेही मत 100% योग्य किंवा अयोग्य नसते. प्रत्येकाला आपण मांडत असलेली बाजू योग्य वाटते. तरी हा विषय केवळ वैचारिक पर्वणी म्हणून घ्यावा असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. ललिता धांडे यांनी केले. या स्पर्धेला कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य श्री. वाय. एम. पाटील व पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. स्वाती पाटील यांनी विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धांमध्ये याचप्रमाणे उत्स्फुर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले. समिती सदस्य प्रा. ए. बी. पालवे व जे. टी. बेंडाळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


