भुसावळ एमआयडीसीत मध्यरात्री अग्नितांडव ; ॲग्रो केमिकल कंपनीला भीषण आग; केमिकल बॅरेलच्या स्फोटांनी उडाली धांदल, चार बंबांसह जिल्ह्यातील अग्निशमन दलाची मदत

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ एमआयडीसी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका ॲग्रो केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री सुमारे बाराच्या सुमारास लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. कंपनीतील केमिकल बॅरेलचे स्फोट होत असल्याने परिसरात एकच धांदल उडाली आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आगीची माहिती मिळताच भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र कंपनीमध्ये केमिकल बॅरेलचे स्फोट होत असल्याने आग आटोक्यात आणताना अग्निशमन जवानांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन वरणगाव, नशिराबाद, दीपनगर यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणांहूनही अग्निशमन दलाची मदत मागविण्यात आली.

शेजारील दोन कंपन्यांनाही झळ

दरम्यान, आगीच्या झळांचा फटका कंपनीच्या शेजारी असलेल्या आणखी दोन कंपन्यांनाही बसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग अधिक पसरू नये आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून पहाटेपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

जीवितहानी टळली

या भीषण आगीत दोन गायीचा मृत्यू झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

कंपनीचे तसेच शेजारील आस्थापनांचे किती आर्थिक नुकसान झाले, याचीही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. संबंधित यंत्रणांकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर नुकसानीचा अंदाज समोर येण्याची शक्यता आहे.

केमिकल बॅरेलच्या स्फोटांमुळे आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने एमआयडीसी परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले.