सुनसगाव-गोंभीतील प्रशिक्षणार्थी महिलांना साहित्य व प्रमाणपत्राची प्रतीक्षा ;


प्रशिक्षण पूर्ण होऊनही साहित्य व प्रमाणपत्र न मिळाल्याचा ग्रामविकास युवा मंचाचा आरोप; खर्चाची चौकशी करण्याची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी ) : तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुनसगाव व गोंभी येथील महिलांसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले होते. सुनसगाव येथे शिवणकामाचे, तर गोंभी येथे ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण ‘राही संस्था, भुसावळ’ यांच्या माध्यमातून देण्यात आले. मात्र प्रशिक्षण पूर्ण होऊन बराच कालावधी लोटल्यानंतरही प्रशिक्षणार्थी महिलांना अद्याप प्रमाणपत्र व संबंधित साहित्य मिळाले नसल्याचा आरोप ग्रामविकास युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

या प्रशिक्षणासाठी संबंधित संस्थेला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुनसगाव व गोंभी येथील प्रशिक्षणाच्या अनुषंगाने धनादेश देण्यात आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र प्रशिक्षणार्थींना साहित्य व प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या संपूर्ण प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

याबाबत ग्रामविकास युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रशिक्षणार्थींना साहित्य व प्रमाणपत्र अद्याप का देण्यात आले नाही, याबाबत त्यांनी विचारणा केली. त्यावर लवकरच प्रमाणपत्र व साहित्याचे वाटप करण्यात येईल, असे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, प्रशिक्षणाच्या कालावधीत संबंधित साहित्य प्रशिक्षणार्थींना उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. प्रशिक्षणादरम्यान साहित्याचा उपयोग करता आला असता; मात्र प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होऊनही साहित्य उपलब्ध झाले नसल्याने प्रशिक्षणाच्या उद्देशाबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याचे ग्रामविकास युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेला कोणत्या ग्रामपंचायत सदस्यांच्या सूचनेवरून धनादेश देण्यात आले, प्रशिक्षणासाठी मंजूर झालेली रक्कम किती होती, प्रत्यक्षात एका महिला प्रशिक्षणार्थीवर किती खर्च करण्यात आला, तसेच प्रशिक्षणासाठी मंजूर साहित्य नेमके कोणते होते, याची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशिक्षणार्थी महिलांना तातडीने प्रमाणपत्र व साहित्याचे वाटप करून संपूर्ण आर्थिक व्यवहार व प्रशिक्षण प्रक्रियेची पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी ग्रामविकास युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला असल्याचे समजते.

या प्रकरणात ग्रामपंचायत प्रशासन तसेच संबंधित प्रशिक्षण संस्था यांची अधिकृत भूमिका आणि प्रशिक्षणासाठी झालेला खर्च याबाबतची माहिती समोर आल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.