भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ शहरातील हुडको कॉलनी परिसरातील गजानन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका कापड व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून 45 हजार रुपयांची रोकड आणि 89 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. या चोरीतील दागिन्यांची आजच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे 13 लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अजय राजकुमार सभागचंदाणी (वय 30) हे कापड व्यावसायिक असून पत्नी मिषका तसेच मुली मेहर (5) आणि अनाया (2) यांच्यासह हुडको कॉलनीतील गजानन मंदिराजवळील गजानन अपार्टमेंटमध्ये राहतात. सोमवारी (3 ऑगस्ट) दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास पत्नी मुलीला शाळेत आणण्यासाठी बाहेर गेल्यानंतर अजय सभागचंदाणी यांना झोप लागली होती. त्याचवेळी लिफ्ट दुरुस्तीचे काम करणारे योगेश शेगावकर आले. दोघेही चौथ्या मजल्यावर गेले असता लिफ्ट दुरुस्तीसाठी ऑईल आवश्यक असल्याने सभागचंदाणी यांनी घराला कुलूप लावून ऑईल आणण्यासाठी बाहेर पडले. काही वेळानंतर परतल्यानंतर मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील कपाट व लॉकर फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी 17 ग्रॅमचे मंगळसूत्र, कानातील टॉप्स, दोन सोन्याच्या अंगठ्या, चार ग्रॅमचे टॉप्स, लहान मुलींच्या चार सोन्याच्या अंगठ्या, दोन सोन्याचे पेंडल, चांदीचे पैंजण, जोडवे तसेच 45 हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे 89 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इतर ऐवज लंपास केला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत चोरी गेलेल्या मालाची नोंद अंदाजे 1 लाख 80 हजार 500 रुपये अशी करण्यात आली असली, तरी सध्याच्या बाजारभावानुसार दागिन्यांची किंमत 13 लाख रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. घटना अवघ्या दोन तासांच्या कालावधीत घडल्याने चोरट्यांनी आधीपासूनच पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला असून पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


