भुसावळात ७ ऑगस्टपासून धार्मिक सप्ताह; आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांच्या जयंती निमित्त विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी )-: राष्ट्रसंत, आचार्य भगवंत परमपूज्य आनंदऋषीजी म.सा. यांची जन्मजयंती दि. १३ ऑगस्ट रोजी देशभरात मोठ्या उत्साहात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांद्वारे साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने भुसावळ शहरात दि. ७ ते १३ ऑगस्ट या कालावधीत भव्य धार्मिक सप्ताह साजरा करण्याचा निर्णय जैन श्रीसंघातर्फे घेण्यात आला आहे.

हा संपूर्ण धार्मिक सप्ताह परमपूज्य गुरुमाई सम्यक दर्शनाजी म.सा. आदी ठाणे तीन यांच्या मंगलमय सानिध्यात भुसावळ येथील सुराणा साधना भवन येथे संपन्न होणार आहे.

धार्मिक सप्ताहादरम्यान जप, तप, आराधना, उपवास, तेलाभिषेक, सामूहिक सामायिक तसेच गुणगौरव प्रार्थना यांसारख्या विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून जैन धर्मीयांना साधना, आत्मचिंतन आणि गुरुवाणीचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

असे असेल दैनंदिन नियोजन

* सकाळी ६.३० वाजता : सामूहिक प्रार्थना
* सकाळी ८.४५ ते १० वाजेपर्यंत : प्रवचन
* दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत : धार्मिक चर्चा
* सायंकाळी : सामूहिक प्रतिक्रमण

या सर्व धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुदर्शन व प्रवचनश्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जैन श्रीसंघातर्फे संघपती जयंतीलाल सुराणा, जे. बी. कोटेचा, अतुल ताथेड, गौतम चोरडिया आणि कांतीलाल चोरडिया यांनी केले आहे.