भुसावळ (प्रतिनिधी)- : येथील जैन समाजात सध्या भक्ती, श्रद्धा आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण असून, परमपूज्य जैन गुरुमाई सम्यक दर्शनाजी म.सा. आदी ठाणे तीन यांच्या पावन सानिध्यात सुराणा साधना भवन येथे चातुर्मास अत्यंत उत्साहात सुरू आहे. चातुर्मासादरम्यान शेकडो जैन बंधू-भगिनी प्रवचन व दर्शनाचा लाभ घेत असून, विविध प्रकारच्या तपस्यांमध्ये सहभागी होत आहेत. याच धार्मिक वातावरणात भुसावळ येथील जैन श्रीसंघाचे सभापती, व्यापारी जळगाव जनता बँकेचे संचालक तसेच विविध सामाजिक व राजकीय संस्थांशी संबंधित असलेले जयंतीलाल शांतीलाल सुराणा यांनी गुरुमाईंच्या सानिध्यात अत्यंत कठीण अशी ९ दिवसीय बिना अन्न-पाण्याची (निर्जला) तपस्या पूर्ण केली आहे. या खडतर तपस्येची सांगता अर्थात पारणा सोहळा आज, दि. ६ ऑगस्ट रोजी गुरुवारी सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान, भुसावळ येथील सुराणा साधना भवन येथे होणार आहे. या निमित्ताने आयोजित विशेष पच्चरखाण धार्मिक कार्यक्रमास तसेच जयंतीलाल सुराणा यांच्या तपस्येच्या अनुमोदनासाठी सर्व जैन धर्मीय व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल जैन संघातर्फे जे. बी. कोटेचा, नितीन सुराणा, महेंद्र सुराणा, राजेश सुराणा आणि अशोक सुराणा यांनी केले आहे.


