भुसावळ (प्रतिनिधी)-: आई-वडील आपल्या आनंदाचा, गरजांचा त्याग अगदी हसतमुखाने करतात. मुलांनी त्यांच्या न बोललेल्या त्यागाची जाण ठेवणे म्हणजेच मायबापाला समजून घेणे. जीवन सुंदर आहे. भविष्याचा विचार करा, कल्पना नकाे. जेव्हा बाप लेकरांना उशिरा येण्यावरून विचारतो किंवा प्रश्न विचारतो, तेव्हा ते त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन नसतं, तर मनातली हळवी काळजी असते, असा सल्ला बीड जिल्ह्यातील गेवराईचे प्रा. डाॅ. समाधान इंगळे यांनी विद्यार्थिनींना दिला. भुसावळात जय गणेश फाउंडेशनतर्फे तीन दिवसीय द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फिरती व्याख्यानमाला घेण्यात आली. त्यात साेमवारी तृतीय पुष्प गुंफताना ते बाेलत हाेते. ‘माय-बापाला समजून घेऊ या’ हा व्याख्यानाचा विषय हाेता. अहिल्यादेवी कन्या विद्यालयात त्यांनी हे समाराेपाचे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मांडे हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पैठणच्या दुर्गा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू गाेरडे-पाटील हाेते. विचारमंचावर जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे यांची उपस्थिती हाेती. ‘द्वारकाई’ व्याख्यानमाला ही भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीचा मानदंड आहे. आयाेजनातील सातत्य हेवा वाटावा असेच आहे, अशा शब्दात महेंद्र मांडे यांनी उपक्रमाचे काैतुक केले. जन्मदात्यांच्या स्वप्नांचा आदर करा… मुला-मुलींवर अपेक्षा लादण्याचा पालकांचा हेतू नसतो, पण समाजात ते स्वाभिमानाने जगावे हीच त्यांची अंतर्मनातील इच्छा असते. बाप आणि लेकीने एकमेकांच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. मुलांनी आई-वडिलांच्या स्वप्नांचा आदर करावा आणि पालकांनीही मुलांच्या स्वतःच्या आवडीनिवडी व क्षमता समजून घेऊन त्यांना पाठिंबा द्या. आई-वडिलांचे जुने विचार हे त्यांच्या जगण्यातून आलेले असतात. ते तुम्हाला मागे खेचण्यासाठी नसून सुरक्षित ठेवण्यासाठी असतात असे डाॅ. इंगळे म्हणाले. आई-वडीलांशी वागताना सयंम ठेवा आजचं तुमचं जग आणि आमचा काळ यात खूप फरक आहे. तुमच्या तंत्रज्ञानाच्या वेगाशी आम्ही कधीकधी जुळवून घेऊ शकत नाही. बदलत्या काळात मुलांनी थोडा संयम ठेवून आई-वडिलांना नवीन गोष्टी समजावून सांगायला हव्या. आई-वडिलांचा राग किंवा ओरडणे यामागे संशयापेक्षा आपल्या लेकरांना काही इजा होऊ नये ही भीती जास्त असते. ती भीती व काळजी समजून घेतली, तर नात्यात दुरावा येत नाही. आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांना मुलांचे मित्र बनून भावनिक साथ द्यावी असा सल्ला वक्ते इंगळे यांनी दिला. ‘दूध डेअरीला जातेय’ कवितेला दाद. ‘माय-बापाला समजून घेऊ या’ या विषयावरील व्याख्यानात वक्ते डाॅ. समाधान इंगळे यांनी ‘दूध डेअरीला जातेय’ कविता सादर केली. त्यातून ग्रामीण भागातील जळजळीत वास्तव, शेतकरी-शेतमजूर यांचे कष्ट आणि दुग्धव्यवसायातून मिळणाऱ्या पैशांसाठी घराबाहेर जाणारे दुग्धजन्य पोषण यावर अत्यंत भावनिक व वास्तववादी प्रकाश टाकला. आई-वडील असतात ताेपर्यंत घर गाेकुळ वाटते. मात्र, त्यातील एकही जरी गेला तर डाेळे भरून येतात. शेती हीच क्रांती आहे पण आज ते दारिद्रय झाले अशी खंतही वक्ते इंगळे यांनी व्यक्त केली


