भुसावळ (प्रतिनिधी) -: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई-दादर येथून विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करून जवळपास चार हजार गोरगरीब धम्मबंधू-भगिनींना बुद्धगया दर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. ना. श्री. संजयजी शिरसाट यांचे भुसावळ येथील महिलांनी संभाजीनगर येथे भेट घेऊन मनःपूर्वक आभार मानले. यावेळी त्यांच्या उल्लेखनीय व समाजाभिमुख कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिक व महिलांना बुद्धगया दर्शनासाठी मोफत रेल्वे प्रवास, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाचा समाजातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील धम्मबंधू-भगिनींसाठी हा उपक्रम अत्यंत दिलासादायक व प्रेरणादायी ठरला आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल मंत्री संजय शिरसाट यांचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून अनुश्री महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री इंगळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माजी उपाध्यक्षा भारती रंधे-म्हस्के, रश्मी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष संगीताताई भामरे, निलूताई, नरवाडे ताई व साबळे ताई यांच्यासह महिला प्रतिनिधींनी संभाजीनगर येथे त्यांची भेट घेतली. यावेळी महिलांनी मंत्री शिरसाट यांना शुभेच्छा देत, “आपल्या हातून भविष्यातही समाजातील वंचित, गरजू, जेष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अधिकाधिक लोककल्याणकारी व समाजाभिमुख कार्य घडावे,” अशी सदिच्छा व्यक्त केली. मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना बुद्धगया दर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महिला प्रतिनिधींनी त्यांचे विशेष आभार मानले. या भेटीमुळे सामाजिक, धार्मिक व जनकल्याणकारी उपक्रमांप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचा गौरव करण्यात आला.


