भुसावळ (प्रतिनिधी) - राजकीय मतभेदांच्या नावाखाली महिलांविषयी अश्लील, अर्वाच्य आणि अपमानास्पद भाषा वापरण्याचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा संतप्त इशारा भोरगाव लेवा पंचायत, ठाया-पाडळसे (विभाग भुसावळ) यांनी दिला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत व्हायरल झालेल्या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये महिला नेत्यांविषयी वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेचा पंचायतने तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पंचायतच्या पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी (दि. ३१) भर पावसात प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महिलांचा सन्मान हा केवळ घोषणांचा विषय नसून समाजाच्या स्वाभिमानाशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे महिलांची बदनामी, चारित्र्यहनन किंवा त्यांच्याविषयी अश्लील भाषेचा वापर करणाऱ्या प्रवृत्तींना समाजाने ठामपणे रोखले पाहिजे, अशी भूमिका पंचायतने मांडली. निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, राजकारणात मतभेद, टीका आणि आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात; मात्र त्यासाठी महिलांच्या सन्मानावर घाला घालणे किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणे कदापि मान्य केले जाणार नाही. राजकीय संघर्षाच्या आडून महिलांविषयी घाणेरडी भाषा वापरणे ही विकृत मानसिकता असून, अशा प्रवृत्तींचा सर्व स्तरांतून निषेध होणे आवश्यक आहे. “महिलांचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान आहे. महिलांचा अवमान करणाऱ्यांना समाजाने कधीही माफ करू नये,” असा ठाम संदेश देत पंचायतने संबंधित प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर भोरगाव लेवा पंचायतचे अध्यक्ष सुहास गोपाळराव चौधरी, सचिव सुभाषचंद्र मधुकर भंगाळे, कोषाध्यक्ष आरती सारंग चौधरी यांच्यासह पंचायतच्या पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


