हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले तापी नदीपात्रात ९० हजार ८६५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग


भुसावळ प्रतिनिधी : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, शुक्रवारी (दि. ३१ जुलै २०२६) सकाळी ८ वाजेच्या आकडेवारीनुसार धरणाचे तब्बल ३६ दरवाजे उघडण्यात  आले आहेत. तापी नदीपात्रात २ हजार ५७३ घनमीटर प्रति सेकंद, म्हणजेच ९० हजार ८६५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणाचे ८ दरवाजे प्रत्येकी १.५० मीटरने, तर २८ दरवाजे प्रत्येकी १.०० मीटरने उघडण्यात आले आहेत

हतनूर धरणाची सध्याची पाणीपातळी २११.९६० मीटर इतकी असून, धरणाची पूर्ण जलसाठा पातळी २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २७९.०० दशलक्ष घनमीटर (७१.९१ टक्के) इतका झाला आहे. तर उपयुक्त पाणीसाठा १४६.५० दशलक्ष घनमीटर (५७.२५ टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.

धरणाचे ८ दरवाजे प्रत्येकी १.५० मीटरने, तर २८ दरवाजे प्रत्येकी १.०० मीटरने उघडण्यात आले आहेत. तसेच कालव्यामधून ५.६६ घनमीटर प्रति सेकंद अर्थात २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राईट साइड (आर.एस.) गेटमधून सध्या कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

दरम्यान, आज सकाळपर्यंत हतनूर धरण परिसरात ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस २५८ मिलिमीटर इतका झाला आहे.

तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.