हतनूर धरणाचे ३६ दरवाजे एक मीटरने उघडे : धरणातून ७८ हजार ८२३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग :

  भुसावळ प्रतिनिधी | दि. ३१ जुलै २०२६ -

हतनूर प्रमुख प्रकल्पातील पाण्याची आवक आणि धरणातील वाढती जलपातळी लक्षात घेता, शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या स्थितीनुसार धरणाचे ३६ रेडियल दरवाजे प्रत्येकी १ मीटरने उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात धरणातून २,२३२ घनमीटर प्रतिसेकंद अर्थात ७८ हजार ८२३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सध्या हतनूर धरणाची जलपातळी २११.९५० मीटर इतकी असून, धरणाची पूर्ण जलसाठा पातळी २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २७८.५० दशलक्ष घनमीटर अर्थात ७१.७८ टक्के, तर उपयुक्त पाणीसाठा १४५.५० दशलक्ष घनमीटर अर्थात ५७.०६ टक्के नोंदविण्यात आला आहे.

धरणातून कालव्याद्वारे ५.६६ घनमीटर प्रतिसेकंद अर्थात २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून, आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

दरम्यान, आज सकाळपर्यंत परिसरात ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान १७२ मिलिमीटर इतके झाले आहे.

तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात प्रवेश करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.