भुसावळ ( 28 जुलै 2026) : तरुणाला शोधण्यासाठी आलेल्या टोळक्याने घरात घुसून धुडगूस घालत नर्स असलेल्या महिलेसह तिच्या पतीला पिस्टल दाखवत मुलाला ठार मारण्याची धमकी दिली तर अन्य संशयीतांनी घरातील आठ हजार रुपये जबरीने लुटल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात मध्यरात्री घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार मीनाक्षी संतोष पाटील (50, व्यवसाय – नर्स) या पतीसह श्रीराम नगरात राहतात. शनिवार, 27 जुलै 2026 रोजी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास सात आरोपींनी श्रीराम नगरातील महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. यावेळी आरोपींनी त्यांच्या मुलगा चेतन याच्याबाबत विचारणा करत आरडाओरड केली तसेच मुख्य आरोपी निलेश चंद्रकांत ठाकुर याने गावठी पिस्टल काढून फिर्यादी व त्यांच्या पतीला दाखवत, चेतनचा पत्ता सांगितला नाही तर गोळ्या घालून ठार करू, अशी थेट धमकी दिली. यावेळी संशयीतांपैकी एक असलेल्या विक्की अशोक कुमार लेखवाणी याने घरातील हॉलमध्ये टांगलेल्या पँटच्या खिशातील आठ हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. सात संशयीतांविरोधात गुन्हा या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात निलेश चंद्रकांत ठाकुर (रा. कंडारी, ता. भुसावळ), हेमंत जगदीश पैठणकर (रा.भुसावळ), प्रशांत संजय चौधरी (रा. भुसावळ), आकाश राजेंद्र पारधे (रा. भुसावळ), दीपक उर्फ ननट्या महालकर (रा. भुसावळ), विक्की अशोक कुमार लेखवाणी (रा. भुसावळ), अक्षय रवी कोळी (रा. भुसावळ) यांच्याविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी हेमंत जगदीश पैठणकर, दीपक उर्फ ननट्या महालकर आणि विक्की अशोक कुमार लेखवाणी यांना अटक केली. अन्य आरोपींचा कसून शोध सुरू आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत


