जळगाव पोलीस मुख्यालयात दोन महिला पोलीस अंमलदार निलंबित : वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ व धमकीप्रकरणी पोलीस अधीक्षकांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी)- वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ व धमकीप्रकरणी पोलीस अधीक्षकांची कारवाईजळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ, धमकी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून दोन महिला पोलीस अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी २१ जुलै रोजी याबाबतचे आदेश जारी केले.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी दुपारी पोलीस मुख्यालयातील हजेरी कक्षात आलेल्या दोन महिला पोलीस अंमलदारांनी हजेरी प्रमुख संभाजी पाटील यांना वेतनवाढीबाबत वरिष्ठांकडे अहवाल का पाठविला, असा जाब विचारला. यावेळी त्यांच्याशी शिवीगाळ करण्यात आली तसेच भ्रष्टाचाराचे आरोप करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशीही आक्रमक वर्तन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी, १७ जुलै रोजी आणखी एका महिला पोलीस अंमलदाराने हजेरी कक्षात येऊन गोपनीय अहवाल वरिष्ठांकडे का पाठविला, असा जाब विचारला. संबंधित अहवाल राखीव पोलीस निरीक्षकांनी पाठविल्याचे सांगितल्यानंतर तिने उपस्थित कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच हजेरी प्रमुख, राखीव पोलीस निरीक्षक आणि अन्य एका कर्मचाऱ्याला चपलेने मारण्याची तसेच न्यायालयात खटला दाखल करून नोकरी करू देणार नसल्याची धमकी दिल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन्ही महिला पोलीस अंमलदारांना निलंबित केले. निलंबनाच्या कालावधीत त्यांना दररोज सकाळी व संध्याकाळी राखीव पोलीस निरीक्षकांकडे हजेरी लावणे बंधनकारक राहणार आहे. तसेच अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालयाची हद्द सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.