नाशिक - नाशिक रोड रेल्वे स्थानकातून प्रवाशाच्या चोरीस गेलेल्या लॅपटॉपचा शोध १४ तासात लावत रेल्वे पोलिसांनी चोराला अटक केली. रेल्वे पोलिस अधिक्षक संदीप पालवे आणि उपविभागीय अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत लॅपटॉप जप्त केला. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे प्रवाशाने समाधान व्यक्त केले आहे. नेमकी घटना काय ते जाणून घ्या मिळालेली माहिते अशी की, सातपूरच्या गणेश नगरमध्ये राहणारे गोकुळ गोपालकृष्ण नायर (३५) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. नायर हे १२ जुलैला वंदेभारत एक्सप्रेसने मुंबईला जाण्यासाठी सायंकाळी साडे सातला नाशिक रोड रेल्वे स्थानकात आले. गाडीला वेळ असल्याने फलाट क्रमांक तीनवरील कट्ट्य़ावर त्यांनी आपली काळ्या रंगाची बॅग ठेवली. त्यात एचपी कंपनीचा चंदेरी रंगाचा लॅपटॉप, चार्जर व साडेपाच हजार रुपये होते. नायर यांना त्यांच्या आईचा फोन आल्याने ते फोनवर बोलत बोलत बॅगपासून दूर गेले. त्याचा फायदा घेत चोरट्याने त्यांची बॅग लांबवली. लॅपटॉप केला जप्त त्यानंतर नायर यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धर्मेंद्र कुमार रामलाल महतो (२८, चमनपुरा, जिल्हा गोपालगंज, बिहार) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबूली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला लॅपटाप व अन्य साहित्य जप्त केले. छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे पोलिस अधिक्षक संदीप पालवे, उपविभागीय अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सचिन बनकर, उपनिरीक्षक सुभाष कुलकर्णी, हवालदार शैलेंद्र पाटील,सचिन दैवे, आरपीएफचे निरीक्षक नवीन प्रताप सिंह, सागर वर्मा, राहुल चौधरी यांनी ही यशस्वी कामगिरी केली.


