भुसावळ : ताप्ती पब्लिक सीबीएसई स्कूलमध्ये ‘रॅनी डे’

भुसावळ (प्रतिनिधी): येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकताच बालमित्रांचा आवडता 'रॅनी डे' (पाऊस दिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या कृत्रिम पावसात भिजत चिमुकल्यांनी मनसोक्त नृत्य केले, विविध खेळांचा आनंद घेतला आणि पावसाळ्याचा अविस्मरणीय अनुभव घेतला.

या अनोख्या उपक्रमात नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनियर केजीमधील सुमारे ३०० ते ४०० विद्यार्थी विविध रंगांचे आणि आकर्षक डिझाईनचे रेनकोट परिधान करून शाळेत दाखल झाले होते. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शालेय व्यवस्थापनाने शाळेच्या आवारात कृत्रिम पावसाची विशेष व्यवस्था केली होती. पावसाच्या सरींमध्ये चिमुकल्यांनी मनमुराद आनंद लुटत बालपणाचा उत्सव साजरा केला.

विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्लास्टिकच्या टबमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या रंगीबेरंगी कागदाच्या होड्या पाण्यात सोडत सर्जनशीलतेचा आणि पावसाळी वातावरणाचा आनंद अनुभवला.

रॅनी डेच्या निमित्ताने पावसाळी गाण्यांवर आधारित विशेष संगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कृत्रिम पावसाच्या धारांमध्ये संगीताच्या तालावर चिमुकल्यांनी मनसोक्त ठेका धरला. नृत्यासोबतच विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत शिक्षकांनीही पावसात भिजण्याचा आणि मुलांसोबत आनंद साजरा करण्याचा अनुभव घेतला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्या निना कटलर, उपप्राचार्या श्रद्धाली घुले यांच्यासह मनप्रीत कौर, स्मिता जाधव, व्हर्जिनीया बर्नड, स्मिता नन्नवरे, सोनिया दोबाल, सिसिलीया मैथ्यू, कियोना रॉड्रिक्स, क्रिस्टीना साबळे, चेतना झोपे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या पावसाळी आनंदोत्सवाचे पालक व नागरिकांकडूनही सर्वत्र कौतुक होत आहे.

फोटो कॅप्शन - भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये रैनी डे निमीत्त प्रिन्सिपल निना कटलर व लहान बालगोपाल विद्यार्थी पावसाचा व पाण्याचा आनंद घेताना. (छाया - निरज पाटील भुसावळ).