जळगाव जिल्ह्यात १४ ते २८ जुलैदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू :

पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावासह विनापरवानगी सभा-मिरवणुकांना बंदी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
जळगाव, दि. १३ (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, यासाठी दि. १४ जुलै २०२६ रोजी रात्री ००.०१ वाजेपासून ते दि. २८ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ च्या पोटकलम (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे
आगामी पंधरवड्यात विविध सण, उत्सव, थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार असून या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम आणि ग्रामीण भागातून छोट्या स्वरूपाच्या पालख्या काढण्यात येतात. या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे आदेश जारी करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या, काठ्या अथवा शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरता येतील अशी कोणतीही वस्तू घेऊन फिरण्यास बंदी राहणार आहे. तसेच दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड अथवा फेकण्याची साधने तयार करणे, जमा करणे किंवा सोबत नेण्यासही मनाई करण्यात आली आहे.

कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिकरीत्या ओरडणे किंवा विक्षिप्त हावभाव करणे तसेच सभ्यता, नीतिमत्ता किंवा सार्वजनिक शांततेला बाधा आणणारी भाषणे, हावभाव, चिन्हे, चित्रे किंवा फलक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ३७ (३) नुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यास तसेच पीपीपोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

तथापि, लाठी किंवा तत्सम आधाराशिवाय चालता येत नसलेल्या वृद्ध अथवा दिव्यांग व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नाही. तसेच शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा, लग्न मिरवणुका आणि धार्मिक मिरवणुकांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. शासनाच्या सेवेतील तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

हे प्रतिबंधात्मक आदेश दि. १४ जुलै २०२६ रोजी रात्री ००.०१ वाजेपासून ते दि. २८ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहणार असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.