भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ पालिकेतील भाजपा प्रभारी राजवटीतील पहिली सर्वसाधारण सभा गुरुवार (16 जुलै) रोजी होणार असून सभेच्या अजेंड्यावर सुमारे 300 विषयांचा समावेश आहे. मात्र विरोधी गटाच्या प्रभागांशी दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप नगरसेविका सुभद्रा गुंजाळ यांनी केला आहे. गुंजाळ यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक 14 मधील 29 विकासकामांचे प्रस्ताव 23 जून रोजी प्रभारी नगराध्यक्षांकडे सादर करण्यात आले होते. यामध्ये रिटेनिंग वॉल, महिला व पुरुषांसाठी प्रसाधनगृह, ओपन स्पेसवर पथदिवे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, उद्यान विकास आदी कामांचा समावेश होता. मात्र ही कामे 16 जुलैच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर न घेता जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


