भुसावळ विभागाची मालडब्यांच्या आरओएचमध्ये उल्लेखनीय कामगिरी; जूनअखेर १,८४३ मालडब्यांचे रूटीन ओव्हरहॉल पूर्ण :

.भुसावळ, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने मालवाहतुकीची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि वेळेवर सेवा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मालडब्यांच्या रूटीन ओव्हरहॉल (आरओएच) कामात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये जूनअखेरपर्यंत विभागाने एकूण १,८४३ मालडब्यांचे आरओएच यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, ही मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १३ टक्के वाढ आहे.

जून २०२६ या एकाच महिन्यात भुसावळ विभागातील वॅगन अनुरक्षण डेपोमध्ये ६०१ मालडब्यांचे आरओएच पूर्ण करण्यात आले. मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एप्रिल ते जून या कालावधीत १,६२९ मालडब्यांचे आरओएच करण्यात आले होते. त्या तुलनेत यंदा विभागाने लक्षणीय प्रगती साधली आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी विभागातील अधिकारी, पर्यवेक्षक आणि अनुरक्षण कर्मचाऱ्यांच्या समन्वयपूर्ण नियोजन, कार्यकुशलता आणि समर्पित प्रयत्नांचे फलित असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

आरओएच (Routine Overhaul) ही मालडब्यांच्या नियमित देखभाल प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. या प्रक्रियेत मालडब्यांची सखोल तपासणी करून ब्रेक प्रणाली, चाके, बेअरिंग, सस्पेन्शन, कपलिंग, बॉडी तसेच इतर महत्त्वाच्या घटकांची पाहणी केली जाते. आवश्यकतेनुसार दुरुस्ती किंवा सुटे भाग बदलून मालडब्यांची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढविण्यात येते.

निर्धारित कालावधीत अधिकाधिक मालडब्यांचे आरओएच पूर्ण झाल्यामुळे त्यांची उपलब्धता वाढली असून, मालगाड्यांचे परिचालन अधिक सुरळीत करण्यास, मालवाहतूक क्षमता वाढविण्यास आणि ग्राहकांना अधिक विश्वासार्ह सेवा देण्यास मदत होत आहे.

भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गुणवत्तापूर्ण अनुरक्षण आणि सुरक्षित रेल्वे परिचालनाला सर्वोच्च प्राधान्य देत मालवाहतुकीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी कायम राखण्याचा भुसावळ विभागाचा निर्धार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.