निंभोरा बुद्रुकमध्ये कचरा व भटक्या कुत्र्यांचा आतंक; नागरिक हैराण, प्रशासनाला १५ दिवसांची मुदत

 दीपनगर निंभोरा बुद्रुक ( प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक गावातील नागरिकांचे कचऱ्याच्या डोंगर व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे हाल होत आहेत. गावातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, या घाणीमुळे रोगराई पसरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लहान मुले व वृद्ध नागरिकांवर होणारे हल्ले चिंताजनक बनले आहेत.

नागरिकांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले असून, पत्रकार प्रकाश सरदार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिकारी व प्रशासक सरपंच यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले. या निवेदनावर रमेशभाऊ खंडारे, उस्मान पठाण, पुंडलिक पाटील, मनोहर निगोते, डॉ. प्रमोद पाटील, सोमा बऱ्हाटे, प्रमोद झांबरे, सचिन जावळे, बी. आर. सरोदे, अरुण पाटील या दहा जणांच्या सह्या आहेत.

निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, सदर कचरा अतिशय तातडीने उचलावा तसेच भटक्या कुत्र्यांचा १५ दिवसांत बंदोबस्त करावा. तसेच, या मागण्या पूर्ण न झाल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी या विषयी गंभीर दखल घेण्याचे आवाहन केले असून, लवकरात लवकर ठोस कारवाई होण्याची मागणी केली आहे.