महिला सुरक्षा आणि रस्ता सुरक्षेसाठी भुसावळात अभिनव उपक्रम; महिला वाहनचालकांना हेल्मेटचे वाटप

भुसावळ (प्रतिनिधी) : महिला सुरक्षा आणि रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी भुसावळ शहरात पोलिस विभाग, इनएचएआय  आणि एनएक्सटी इन्फ्रा सीटी हायवे अथॉरिटी प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हेल्मेट वितरण अभियान राबविण्यात आले. या उपक्रमातून दुचाकी वाहन चालविणाऱ्या महिलांना हेल्मेटचे वाटप करून सुरक्षित वाहतुकीचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी  केदार बारबोले, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ, इनएचएआय चे प्रतिनिधी सोहेब खान तसेच एनएक्सटी इन्फ्रा सीटीचे प्रतिनिधी पायल बुधवानी, महिला पोलिस उपनिरीक्षक भारती काळे यांचेसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

भुसावळ शहरात रस्ता सुरक्षा अधिक बळकट करण्यासह महिलांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महिला वाहनचालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना डीवायएसपी केदार बारबोले म्हणाले की,"हेल्मेट हे केवळ दंडापासून बचाव करण्याचे साधन नसून जीवन वाचविणारे सुरक्षाकवच आहे. प्रत्येक महिलेने स्वतः हेल्मेट वापरावे आणि आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्यासाठी प्रेरित करावे."

पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी सांगितले की, रस्ते अपघातांमध्ये डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापती हेल्मेटच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात टाळता येतात. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

इनएचएआय चे सोहेब खान आणि एनएक्सटी इन्फ्रा सीटी. च्या पायल बुधवानी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती वाढविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील. नागरिकांमध्ये सुरक्षित प्रवासाची सवय निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाला उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पोलिस प्रशासन आणि संबंधित संस्थांच्या प्रयत्नांचे स्वागत केले. हेल्मेट वितरणासोबतच वाहतूक नियमांची माहिती देण्यात आल्याने हा कार्यक्रम जनजागृतीसाठी प्रभावी असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.

महिला सुरक्षा आणि रस्ता सुरक्षेला समर्पित असलेला हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला असून पोलिस विभाग, इनएचएआय आणि एनएक्सटी इन्फ्रा सीटी हायवे अथॉरिटी प्रा. लि . यांच्या संयुक्त पुढाकाराचे शहरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.