सुनसगाव (वार्ताहर ) – भुसावळ तालुक्यातील सुनसगाव ते बेलव्हाळ गावाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत असून पावसाळा तोंडावर आला असताना अद्याप डांबरीकरण न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी बेलव्हाळचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याचे काम फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र चार महिने उलटूनही रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खडी व खड्ड्यांमुळे वाहने वारंवार पंक्चर होत असून टायरचेही नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या मार्गावर वराडसीम, सुनसगाव, बेलव्हाळ आणि निमगाव या गावांतील नागरिकांची नियमित वर्दळ असते. विद्यार्थ्यांपासून शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. यासंदर्भात ठेकेदाराकडे विचारणा केली असता, "डांबर महाग झाले असून उपलब्ध होत नसल्याने काम रखडले आहे," असे कारण सांगितले जात असल्याची माहिती बेलव्हाळचे सरपंच यांनी दिली. मात्र डांबर उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी किती दिवस या खराब रस्त्याचा त्रास सहन करायचा, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे, अन्यथा पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत लवकरच राज्याचे मंत्री ना. संजयभाऊ सावकारे यांच्याकडे तक्रार करून रस्ता काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे बेलव्हाळ ग्रामस्थांनी सांगितले. "पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण करा, अन्यथा नागरिकांचा संताप वाढेल," असा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.


