भुसावळ (प्रतिनिधी) - भुसावळ येथील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध विधीतज्ञ एड. जगदीश दादा कापडे यांचे आज उपचार घेत असताना अल्पशा आजाराने सहयोग क्रिटिकल हॉस्पिटल जळगाव येथे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भुसावळ परिसर व जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरलेली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रसिद्ध विधी तज्ञ म्हणून सेवादेत होते . अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीच्या न्यायालयीन खटल्यात त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. परिसरातील सामान्य, गोरगरीब जनतेला मोफत व कायदे विषयक सल्ला देण्यात ते नेहमीच पुढे असायचे. त्यांच्या निधनाने सामान्य जनतेचा विधीतज्ञ हरपल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.
प्रभावी वक्तृत्व आणि अफाट संघटन कौशल्य असल्याने जवळपास दोन दशकांपूर्वी त्यांनी जळगाव जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून यशस्वी कार्य करून शिवसेनेचे संघटन जिल्ह्यात गाव खेड्यात मजबूत केले होते . शोषित आणि वंचित अन्यायग्रस्त व्यक्ती अथवा लोक समूहाला शासन प्रशासनाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यात ते नेहमीच पुढे असायचे. प्रसंगी न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग घेऊन ते न्याय मिळवून देत होते. त्यांच्या या सहकार्यशील स्वभावामुळे त्यांनी फार मोठा मित्रपरिवार व कार्यकर्त्यांचा गोतावळा विविध क्षेत्रात निर्माण केलेला आहे. आपल्या कार्यातून आयुष्याच्या अखेरपर्यंत हा प्रेमाचा गोतावळा त्यांनी जपला.
गरजू आणि गरीब लोकांना ते बऱ्याचदा मोफत विधी व न्यायालयीन प्रक्रिया संदर्भातील मार्गदर्शन करीत असत. वाद विवाद, भांडण तंटे , सामोपचाराने कायद्याच्या माध्यमातून कसे मिटतील यावर त्यांचा नेहमीच भर असायचा.
त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या चाहत्या वर्गांवर दुःखाची शोककळा पसरली आहे . उद्या सकाळी (बुधवार ) रोजी सकाळी ९ वाजेला त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल,भुसावळ जवळील निवासस्थानातून निघेल .
त्यांच्या पश्चात ,दोन मुल , सुना ,दोन मुली जावई,पत्नी , नातवंडे असा परिवार आहे . ते ॲड मिलिंद कापडे यांचे वडील होत.