भुसावळातील खेळाडूची अखिल भारतीय विद्युत क्रीडा राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी; किशोर सपकाळे यांचा सत्कार

भुसावळ (प्रतिनिधी) – अखिल भारतीय विद्युत क्रीडा 47 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण संघाने विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत भुसावळ येथील फेकरी विभागातील शिंदी कक्षाचे वरिष्ठ तंत्रज्ञ किशोर भगवान सपकाळे यांनी बास्केटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत महावितरणचे नाव उज्ज्वल केले.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी डी. डी. महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदी कक्षाचे अभियंता आखरे, मानव संसाधन विभागाचे कुणाल खोंडे, दीपक पाटील, बिलिंग विभागातील पदाधिकारी तसेच संघटनेचे पदाधिकारी रविंद्र गायकवाड, मुकेश कोल्हे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

सपकाळे यांच्या यशामुळे शिंदी कक्षासह संपूर्ण महावितरण परिवारात आनंदाचे वातावरण असून उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.