वेल्हाळे येथील श्रीगणेश महिला शेतकरी गटाचा उपक्रम; 1000 लिटर एक अर्काची यशस्वी निर्मिती ;

भुसावळ (प्रतिनिधी) : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 मध्ये सहभागी झालेल्या वेल्हाळे (ता. भुसावळ) येथील श्रीगणेश महिला शेतकरी गटाने कृषि विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे 1000 लिटर दशपर्णी अर्क तयार करून एक आदर्श उपक्रम राबविला.

दशपर्णी अर्क निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या दहा प्रकारच्या वनस्पतींचा पाला तसेच इतर आवश्यक साहित्य गोळा करून महिलांनी ते कापणे, कुटणे आणि प्रक्रिया करून सेंद्रिय पद्धतीने दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक केले. प्रारंभी 800 लिटर दशपर्णी अर्क तयार करण्याचे नियोजन होते. मात्र उपलब्ध पाल्याचे प्रमाण अधिक असल्याने महिलांनी अतिरिक्त साहित्याची वेळेत व्यवस्था करून आणखी 200 लिटर अर्क तयार केला. अशा प्रकारे एकूण 1000 लिटर दशपर्णी अर्क निर्मितीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर सौ. संगीता पाटील यांनी दशपर्णी अर्क तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया उपस्थित महिला सदस्यांना समजावून सांगितली. तसेच BBF पेरणी, उताराला आडवी मशागत, नैसर्गिक कीड नियंत्रण आणि स्मार्ट शेतीच्या विविध बाबींवर मार्गदर्शन केले.

पाणी फाऊंडेशनच्या फिल्ड ऑफिसर कु. प्रियंका बैसाणे यांनी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेची माहिती देत स्पर्धेतील गुणांकन पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. सेंद्रिय आणि गटशेती ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच वेल्हाळे येथील कृषी सेविका श्रद्धा अभंग यांनी महिला शेतकऱ्यांना उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

या कार्यक्रमात गटातील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. SOP पद्धतीचा अवलंब करून सहकार्याने गटशेती व स्मार्ट शेती करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. फार्मर कप स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी सहभागी होण्याचा आत्मविश्वासही महिलांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी गटाच्या निमंत्रक सौ. रुपाली पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीगणेश महिला शेतकरी गटातील सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.