भुसावळ (प्रतिनिधी ) – बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी आज दि. 27 मे 2026 रोजी सायंकाळी 5.30 ते 7.30 वाजेदरम्यान भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत साकेगाव व निंभोरा बु. येथे दंगा काबू योजना आणि रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

साकेगाव येथे मरिमाता चौक, भवानीनगर, पोळा मैदान, पटेल गल्ली ते पुन्हा मरिमाता चौक या मार्गावर पोलिसांनी रूट मार्च काढत परिसराची पाहणी केली. तसेच निंभोरा बु. येथे गैबन शाह वाली बाबा दर्गा, ग्रामपंचायत परिसर, शिवाजीनगर, सर कॉलनी आणि चेतन हॉटेल मार्गे पोलिसांनी संचलन करत नागरिकांना शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले.
या रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशनचे अधिकारी, 15 पोलीस अंमलदार तसेच 25 होमगार्ड सहभागी झाले होते. पोलिसांनी दंगा काबू सरावाद्वारे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याच्या तयारीची चाचणी घेतली.
सण उत्साहात आणि शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


