भुसावळ (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिन अभियानाच्या निमित्ताने प्रादेशिक रेल्वे प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे आज दिनांक 26.05.2026 रोजी ग्रंथालयात पर्यावरण संरक्षणाशी संबंधित “हवामान बदल : धरतीमातेपुढील निर्माण झालेली आव्हाने” या विषयावर निबंध स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धकांनी कार्यक्रम यशस्वी केला.

भुसावळ विभागातील स्काऊट्स आणि गाईड्स यांनी शेगाव स्थानकाच्या प्रतीक्षालय व प्लॅटफॉर्मवर पथनाट्य सादर करून प्रवासी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना पर्यावरण संरक्षण आणि सिंगल यूज प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली. यावेळी प्रवाशांना प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे तसेच पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच स्थानक परिसर स्वच्छ ठेवणे आणि सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश देण्यात आला.
याशिवाय, जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत विविध रेल्वे स्थानके, रेल्वे वसाहती आणि परिसरांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाशी संबंधित विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. या प्रसंगी प्लास्टिक प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये प्लास्टिक बाटली क्रशिंग मशीनच्या कार्यपद्धतीचा आढावा, सिंगल यूज प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी तपासणी, वॉटर रिफिल केंद्रांची पाहणी तसेच प्लास्टिक प्रदूषणाबाबत प्रवासी सूचना प्रणालीद्वारे जनजागृती संदेशांचा समावेश होता. तसेच केटरिंग सेवांमध्ये सामान्य प्लास्टिक उत्पादनांऐवजी पुनर्वापरित (रिसायकल्ड) प्लास्टिक उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात आले.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत पुढील काळातही पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात येतील.


