भुसावळ तहसील प्रशासनाची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतुकीवर ४.४५ लाखांचा दंड वसूल: दोन वाहने जप्त;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तहसील कार्यालयाच्या अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधात्मक पथकाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत दोन वाहने जप्त केली असून संबंधितांवर तब्बल ४ लाख ४५ हजार ३८० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

दि. २० मे २०२६ रोजी रात्री गस्तीदरम्यान दि. २१ मे रोजी पहाटे सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास मौजे गोजोरा येथील मंदिराजवळ सुनसगाव–गोजोरा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने डंपर वाहन क्रमांक MH19CW882 मध्ये अंदाजे ५ ब्रास अवैध वाळू तसेच ट्रॅक्टर वाहन क्रमांक MH19AP7034 मध्ये १ ब्रास अवैध वाळू वाहतूक करताना पकडले.

वाहन चालकांकडे वैध परवाना व अधिकृत पावतीची विचारणा करण्यात आली असता कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे पुढील दंडात्मक कारवाईसाठी दोन्ही वाहने जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली.

या प्रकरणात डंपर वाहनावर ३,२१,१५० रुपये तर ट्रॅक्टर वाहनावर १,२४,२३० रुपये असा एकूण ४,४५,३८० रुपये दंड आकारून वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख श्रीमती रजनी तायडे, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती साधना खुळे (गोजोरा), श्रीमती सुनिता वळवी, श्री गोपाळ भगत, श्री उमेश बाभुळकर, श्री रूपेश लिधोरकर, श्री प्रमोद ठोसर व श्री सुनील कचगुंडे यांनी संयुक्तरीत्या केली.

दरम्यान, या धडक कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असून महसूल प्रशासनाने अशा कारवाया पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.