भुसावळात खळबळ: घुसखोर बांगलादेशी महिलेस अटक;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली असून, तिच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २६५/२६ अन्वये इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक कायदा २०२५ अंतर्गत कलम २१, २२ व २३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव येथे अशाच प्रकारे बांगलादेशी महिला आढळून आल्यानंतर आता भुसावळमध्येही तत्सम प्रकरण उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (वय ४२) असे असून ती बांगलादेशातील भीमकाठी, उपजिल्हा नाझीरपूर, जिल्हा पीरोजपूर येथील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. भारतात आल्यानंतर ती “जस्मिन बी मोहम्मद खान” या नावाने दीनदयाल नगर, भुसावळ येथे राहत होती.

प्राथमिक चौकशीत आरोपी महिलेने सन २००९ मध्ये एका दलालास ५ हजार रुपये देऊन बोटीच्या सहाय्याने नदीमार्गे बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानंतर ती रेल्वेने भुसावळ येथे आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला. मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणात IMO आणि WhatsApp अॅपद्वारे बांगलादेशी कंट्री कोड (+880) असलेल्या क्रमांकांशी सातत्याने संपर्क, चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल झाल्याचे पुरावे आढळून आले. तसेच मोबाईलमध्ये आरोपीच्या जन्मदाखल्याची प्रतही सापडली.

पुढील चौकशीत आरोपीने तिच्या मृत बहिणीच्या नावावरील लाईट बिल व इतर कागदपत्रांचा वापर करून स्वतःचे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक पासबुक तसेच भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याचे समोर आले. या बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे ती मे २०२३ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परत आल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.

या प्रकरणात आरोपीला बनावट कागदपत्रे तयार करून देणारे एजंट, दलाल आणि संबंधित व्यक्तींचा शोध पोलीस घेत असून पुढील सखोल तपास सुरू आहे.