भुसावळ, दि. १९ (प्रतिनिधी ) -नशिराबाद ते

घोडसगाव दरम्यान महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून वाढत्या अपघातांना ब्रेक लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला घेत महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नूतन अपर अधीक्षक संदीप गावीत यांनी स्वतः रस्त्यावर उतरून मुक्ताईनगर ते भुसावळ उपविभागातील १५ हून अधिक ‘ब्लॅक स्पॉट’ची (अपघात प्रवण क्षेत्र) प्रत्यक्ष पाहणी केली व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अपघात रोखण्यासाठी तातडीने स्ट्रक्चरल बदल करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मागील काही महिन्यांत साकेगाव, दीपनगर आणि
मुक्ताईनगर परिसरातील महामार्गावर भीषण अपघात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी भुसावळ व मुक्ताईनगर उपविभागातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी आणि नहीच्या वरिष्ठ तंत्रज्ञांसोबत एक संयुक्त दौरा केला. यावेळी डीवायएसपी केदार बारबोले, निरीक्षक राहुल वाघ, निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह नहीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नशिराबादपासून ते मुक्ताईनगरातील घोडसगावपर्यंतच्या मार्गावरील ब्लॅक स्पॉटची पाहणी केली. यावर उपाय करण्यासाठी नहीच्या अधिकाऱ्यांना त्यादृष्टीने सूचना दिल्या. तथापि, महामार्गावरील जिओ पेट्रोल पंप, आदेश टी-पॉईंट (साकेगाव), वांजोळा चौफुली, पटेल टी-पॉईंट, तेली पेट्रोल पंप, सरगम गेट, दिपनगर, कपिल
वस्ती, महारुद्र हॉटेल समोर, हरताळा फाटा, मुक्ताईनगर चौफुली, प्रवीण पेट्रोल पंप आणि तिगरे फाटा या ठिकाणच्या भौगोलिक रचनेची आणि तांत्रिक त्रुटींची पाहणी करण्यात आली. दरम्यान, महामार्गावरील काही वळणे, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि रस्त्याची चुकीची ठेवण यामुळे अपघात होत असल्याचे निरीक्षण या दौऱ्यात नोंदवण्यात आले. याबाबत नहीच्या अधिकाऱ्यांना तातडीने डागडुजी आणि रचनेत बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तासेच एखादा अपघात घडल्यास जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये (पहिल्या तासात) उपचार मिळण्यासाठी स्थानिक पोलिसांनी काय नियोजन करावे, याबाबत विशेष टीप्स गावित यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या.


