भुसावळ (प्रतिनिधी ) – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर योजना तसेच राज्य शासनाच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप योजना अंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येत असून, ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावरील वीजबिल शून्य करण्याची सुवर्णसंधी साधावी, असे आवाहन महावितरणच्या भुसावळ तालुक्यातील शिंदी वितरण केंद्राकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून ग्रामपंचायत शिंदीचे सरपंच व ग्रामसेवक यांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, या योजनेंतर्गत विविध प्रवर्गातील लाभार्थ्यांना अंदाजे ८० ते ९५ टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळणार आहे. बीएलपी ग्राहकांना ९५ टक्के, अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) ग्राहकांना ९० टक्के तर जनरल प्रवर्गातील ग्राहकांना ८० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
यामुळे लाभार्थ्यांना केवळ प्रवर्गानुसार सुमारे २ हजार ५०० ते १० हजार रुपये भरून एक किलोवॅट क्षमतेचे सोलर सिस्टम शासनामार्फत बसवून मिळणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी ग्रामपंचायतीमार्फत जनजागृती करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच अधिक माहितीसाठी महावितरण कार्यालय अथवा संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती सहाय्यक अभियंता, महावितरण, शिंदी वितरण केंद्र यांच्या वतीने देण्यात आली.


