भुसावळात मारुतीरायाला 501 किलो आंब्यांचा भव्य नैवेद्य : डीवायएसपी केदार बारबोले यांच्या हस्ते महाआरती; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील मारुती मंदिरात गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या अखंड सामूहिक हनुमान चालीसा पठण उपक्रमाचा 121 वा सप्ताह अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या विशेष सप्ताहानिमित्त श्री हनुमानजींना तब्बल 501 किलो आंब्यांचा भव्य नैवेद्य अर्पण करण्यात आला. या अनोख्या धार्मिक सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भुसावळ शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

गेल्या 30 महिन्यांपासून मंदिरात अखंडपणे सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम सुरू असून, या 121 व्या सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ सुरू झाली होती. सामूहिक हनुमान चालीसा पठणात शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “जय हनुमान”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.

या सप्ताहातील मुख्य आकर्षण ठरलेल्या महाआरतीचा मान डीवायएसपी केदार बारबोले यांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते मारुतीरायाची विधीवत महाआरती करण्यात आली. यावेळी शहरातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मारुतीरायाला 501 किलो आंब्यांचा छप्पन भोगासमान नैवेद्य अर्पण केल्यानंतर भाविकांना आंबा प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच मंदिर समितीतर्फे बुंदी, खिचडी-भात आणि केळींच्या महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी मारुती मंदिर समिती, वैष्णव परिवार आणि स्थानिक सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजात धर्मजागृती निर्माण व्हावी तसेच तरुण पिढीला भारतीय संस्कृतीची जोड मिळावी, या उद्देशाने सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसरात भाविकांची गर्दी कायम होती.