जिल्हा हादरला; नराधम शिक्षकाचा दहा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार :

धरणगाव – जी. प . शाळेतील एका नराधम शिक्षकानेच अवघ्या दहा वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना धरणगाव तालुक्यात घडल्याने समाजमन संतप्त झाले आहे. धरणगाव पोलिसात नराधम शिक्षक नंदलाल नारायण मराठे विरुद्ध पॉक्सो सहित विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह धरणगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्याला असून जि.प. शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेते. आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा तिला शाळा भरण्यापूर्वी सकाळी 10 वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून व शाळा रिकामी असल्याचा फायदा घेऊन तो तिच्यासोबत घृणास्पद कृत्ये करीत असल्याचे समोर आले आहे. पीडीतेला त्याने अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषणही केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकाराला विरोध केल्यास पीडीतेला मारहाण करण्यात येत होती व आई-वडील मरून जातील, अशी धमकीही देत असल्याचे समोर आले आहे.

शाळेच्या सुट्यांमध्ये मुलगी आपल्या नातेवाईकांकडे गेली असता, तिथे तिची तब्येत बिघडली आणि तिने जेवण करणे बंद केले. नातेवाईकांनी तिला विश्वासात घेतले असता, तिने रडत-रडत तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. 30 एप्रिल 2026 रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशीही या नराधम शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांनी आरोपी नंदलाल मराठे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करत आहेत.