सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका; पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर ‘तीन’ रुपयांची वाढ,


देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक झटका बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक तणावाचा परिणाम आता थेट भारतातील इंधन दरांवर दिसू लागला आहे.

इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. विशेषतः होर्मुज खाडी परिसरातील तणावामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने अनेक देशांमध्ये इंधन संकटाची परिस्थिती निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

नवीन दरानुसार मुंबईत पेट्रोलचा दर 106.50 रुपयांवर तर डिझेलचा दर 93 रुपयांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक, टॅक्सी आणि रिक्षाचालकांमध्ये चिंता वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरण सुरू असून त्याचाही परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होणार असून आगामी काळात मालवाहतूक, भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, टॅक्सी आणि रिक्षा संघटनांकडूनही भाडेवाढीचे संकेत दिले जात आहेत. केंद्र सरकारकडून आजपासून नवीन दर लागू करण्यात आल्याचे बोलले जात असून वाढत्या जागतिक तणावामुळे पुढील काळात इंधन दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.