कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन!

जळगाव – येथील पोलीस मुख्यालय कार्यरत असणाऱ्या दोघा पोलीस अंमलदारांना कर्तव्यात कसूर केला म्हणून शिस्तभंगाची कारवाई करून दोघांना निलंबित करण्यात आले आहे. दि.८ मे रोजी रात्री ९:२० वाजता राखीव पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षक बंगल्यावरील गार्ड ड्युटीची अचानक तपासणी केली असता, गार्ड ड्युटीवर नियुक्त असलेले सहाय्यक फौजदार संभाजी निबाजी पाटील व पोना प्रदीप भगतसिंग राजपूत हे दोघेही आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित आढळून आले.

यावेळी तपासणी केली असता गार्ड रूममध्ये ठेवलेल्या ३ एस.एल.आर. रायफल्स पैकी बट नं. ८२.२६२.८८२ ही रायफल कोणत्याही दारूगोळ्या शिवाय तसेच आवश्यक सुरक्षितता न बाळगता बेवारस स्थितीत आढळून आली, ही बाब अत्यंत गंभीर मानण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी ड्युटीवरून गैरहजर राहणे तसेच शस्त्रास्त्रांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा करणे हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे स्पष्ट उल्लंघन असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संबंधित दोन्ही अंमलदारांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले असून निलंबन कालावधीत ते पोलीस मुख्यालय जळगाव येथेच राहतील. तसेच पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.