जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर भुसावळ नगराध्यक्षपदाचे पदभार उपनगराध्यक्ष यांना तात्काळ सुपूर्द करण्याचे आदेश

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपरिषदेतील माजी नगराध्यक्ष सौ. गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांच्या संदर्भात मोठी प्रशासकीय आणि राजकीय घडामोड समोर आली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी त्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर राज्य शासनाने त्यांची नगराध्यक्ष म्हणून झालेली निवड रद्द केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने ४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, भंगाळे यांची नगराध्यक्षपदावरील निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात आली असून त्या पदावर राहण्यास अपात्र ठरल्या आहेत.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरे अधिनियम १९६५ मधील कलम ५७(२) नुसार, अध्यक्ष पदासाठी अपात्र ठरलेल्या व्यक्तीने तात्काळ पदाचा कार्यभार उपनगराध्यक्षांकडे सुपूर्द करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनीही आदेश दिले होते.

दरम्यान, उपनगराध्यक्ष सौ. शैलजा पुरुषोत्तम नारखेडे यांनी ५ मे रोजी प्रशासनाकडे दिलेल्या अर्जात, गायत्री भंगाळे यांनी अद्याप पदभार न सोपवल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी कलम ५७(४) अंतर्गत आदेश जारी करत भंगाळे यांना तात्काळ नगराध्यक्ष पदाचा कार्यभार, तसेच सर्व कागदपत्रे, अभिलेखे आणि मालमत्ता उपनगराध्यक्ष नारखेडे यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच, आदेशाचे तात्काळ पालन न झाल्यास कलम ५७(५) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील प्रशासकीय आणि राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.