चाळीसगाव – चाळीसगाव शहरातील एका २४ वर्षीय तरुणीने शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध तक्रार दाखल केली असून या तक्रारीत ब्लॅकमेलिंग, जबरदस्ती, मारहाण आणि आर्थिक शोषणाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी यश महेंद्र जैन (रा. शास्त्रीनगर, चाळीसगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

फिर्यादी तरुणी सध्या बाहेरगावी शिक्षण घेत असून, २०२२ साली आरोपीशी तिची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले; मात्र त्यानंतर आरोपीने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तिचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला वारंवार भेटण्यास भाग पाडले व शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकला, असे फिर्यादीत नमूद आहे.
तरुणीने विरोध केल्यावर आरोपीने मारहाण, शिवीगाळ आणि अश्लील वर्तन केल्याचेही समोर आले आहे. तसेच धमकावत वेळोवेळी पैशांची मागणी करून सुमारे ₹8,12,000 रोख व ऑनलाइन स्वरूपात तसेच सुमारे 90 ग्रॅम सोन्याचे दागिने उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेदरम्यान आरोपीने तरुणीचा टॉप फाडून तिला अर्धनग्न अवस्थेत गाडीतून उतरवले व तिच्या पर्समधील पैसे जबरदस्तीने घेतल्याचाही गंभीर आरोप आहे. याशिवाय सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून बदनामी करण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीने अशाप्रकारचे कृत्य इतर मुलींशीही केले आहे का, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू असून पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.
पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करत आहेत.


