भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील सुनसगाव येथे घरफोडी करून सुमारे ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप मुरलीधर पाटील (वय ६९, व्यवसाय शेती, सध्या रा. नाशिक रोड, नाशिक; मूळ रा. सुनसगाव ता. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजिंक्य राजेंद्र चौधरी (रा. सुनसगाव ता. भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दि. ४ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी यांच्या मालकीच्या सुनसगाव येथील घर क्रमांक १६९ च्या वरच्या मजल्यावरील घरात अज्ञातरीत्या प्रवेश करून चोरी करण्यात आली. आरोपीने दरवाज्याची कडी बाजूने काढून दरवाजा उघडत घरात प्रवेश केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
घरातील तांबे, पितळ व कासेची भांडी तसेच दोन लोखंडी खाटा असा एकूण सुमारे ४१,००० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ही चोरी आरोपी अजिंक्य चौधरी यानेच केली असावी, असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक ०९३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४), ३३१(३) व ३०५(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धीरज मंडलीक करीत आहेत.


