भुसावळ (प्रतिनिधी) : अक्षयतृतीयेच्या निमित्ताने भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित ‘आठवणीतील माहेर’ या कार्यक्रमात शहर व तालुक्यातील सहाशेहून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जुन्या आठवणींना उजाळा दिला. पारंपरिक संस्कृतीचा साज चढलेल्या या उपक्रमात महिलांनी विविध स्पर्धा, खेळ आणि नृत्यांमधून मनमुराद आनंद लुटला.


बालाजी लॉन येथे आयोजित कार्यक्रमात सुवासिनींचे सजवलेल्या बैलगाडीतून आगमन करून विशेष स्वागत करण्यात आले. उपस्थित महिलांसाठी आंब्याचा रस, पुरणपोळी, आमटीचे जेवण यांचा आस्वाद ठेवण्यात आला तसेच हळदी-कुंकू समारंभ व ओटी भरण्याची पारंपरिक पद्धत पार पडली.
कार्यक्रमात ‘बेस्ट इंडियन ब्राईडल’, समूह नृत्य, वेशभूषा, निबंध आणि मेहंदी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली, तर लकी ड्रॉमधील सखींचा पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. ‘गेम्स शो’मध्येही महिलांनी उत्साहाने सहभाग घेत धमाल उडवली. सचिन भिडे यांनी खेळांचे सूत्रसंचालन करत वातावरण रंगवले.
समारोपावेळी डीजेच्या तालावर महिलांनी नृत्य करत जल्लोष केला. या कार्यक्रमाद्वारे महिलांना माहेरपणाचा आनंद देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी सांगितले. बदलत्या जीवनशैलीत हरवत चाललेल्या परंपरा जपण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, केदार बारबोले, मोहिनी राहुल बियाणी, सुनंदा औंधकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शुभेच्छा देताना या उपक्रमातून संस्कृती व परंपरांचे जतन होत असल्याचे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले, तर यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



