लग्नाच्या दिवशीच मोठ्या बाबांचे निधन; आनंदाच्या घरात पसरली शोककळा : शोकमय वातावरणात विवाह संपन्न

वरणगाव (प्रतिनिधी)- लहान भावाच्या मुलीच्या लग्नासाठी अनेक दिवसांपासून सुरू असलेली उत्साहाची लगबग एका क्षणात शोकात बदलली. शहरातील काळबांडे वाडा परिसरात १ मे रोजी ही हृदयद्रावक घटना घडली.

ज्ञानेश्वर प्रभाकर गव्हाणकर यांच्या ज्येष्ठ कन्येचे लग्न सुनील सुकदेव माळी यांच्या मुलासोबत निश्चित झाले होते. या निमित्ताने दोन्ही कुटुंबांत आनंदाचे वातावरण होते. पुतणीचे लग्न सुरळीत पार पडावे यासाठी मोठे बाबा सदाशिव प्रभाकर गव्हाणकर (वय ५२) स्वतः सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होते.

३० एप्रिल रोजी हळद समारंभ, पाहुण्यांचे जेवण आणि रात्री डीजेवर नाचगाणी असा कार्यक्रम पार पडला. दिवसभराच्या धावपळीमुळे थकलेले सदाशिव गव्हाणकर हे लवकर झोपले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उठविण्याचा प्रयत्न करूनही ते प्रतिसाद देत नसल्याने कुटुंबीयांनी तपासले असता त्यांचे निधन झाल्याचे लक्षात आले.

लग्नाच्या दिवशीच घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाची वार्ता समजताच लग्नमंडपातील आनंद पूर्णपणे विरून गेला. पुतणीचे कन्यादान करून तिचे सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या मोठ्या बाबांचा असा अचानक अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मुहूर्त ठरलेला असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने, मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत शोकमय वातावरणात विवाह पार पडला. त्यानंतर सायंकाळी सुमारे सात वाजता सदाशिव गव्हाणकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोक व्यक्त केला जात आहे.