सळई चोरी प्रकरणी गुन्ह्याचे धागेदोरे चाळीसगावात :लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त; आयशर गाडी अद्याप बेपत्ता;

जालना – भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे घडलेल्या लोखंडी सळई चोरी प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून चोरीस गेलेल्या सळईपैकी बहुतांश मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, चोरीस गेलेली आयशर गाडी अद्याप बेपत्ता असून तिचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी स्वप्निल सत्यनारायण राठी (वय ३६, रा. हसनाबाद) यांनी हसनाबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. राठी यांचे ‘गुरुमाऊली ट्रेडर्स’ नावाचे दुकान असून ६ एप्रिल रोजी सायंकाळी भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रा. लि., जालना येथून (क्र. MH 21 X 4885) आयशर गाडीत सुमारे १३,९१० किलो लोखंडी सळई आणून दुकानासमोर उभी करण्यात आली होती. कामगार उपलब्ध नसल्याने सळई दुसऱ्या दिवशी उतरवण्याचे ठरवण्यात आले होते.

मात्र, ७ एप्रिल रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर आयशर गाडी व त्यातील सळई चोरीस गेल्याचे आढळून आले. या घटनेत सुमारे ८ लाख रुपये किमतीची आयशर गाडी तसेच विविध आकाराच्या लोखंडी सळई मिळून एकूण १६ लाख ५९ हजार १६३ रुपयांचे नुकसान झाले. ही चोरी ६ एप्रिल रात्री १०.३० ते ७ एप्रिल सकाळी ८.३० दरम्यान झाल्याचा अंदाज आहे.

तपासादरम्यान गुन्ह्याचे धागेदोरे चाळीसगाव शहरात मिळाल्यानंतर जालना पोलिसांनी चाळीसगाव शहर पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ८ लाख ५० हजार रुपये किमतीचा लोखंडी सळईचा साठा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी ताबीज शेख याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. तपासात आणखी संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, चोरीस गेलेली आयशर गाडी अद्याप हाती लागलेली नसून तिचा शोध सुरू आहे.