सावद्यात श्री स्वामीनारायण मंदिरात अक्षय तृतीये निमित्त सामूहिक २१०० ‘घागर भरणी’ सोहळा उत्साहात

सावदा (प्रतिनिधी)-
सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात अक्षय तृतीया निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक ‘घागर भरणी’ कार्यक्रम संतांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या वेळी पितृ तर्पणासाठी तब्बल २१०० घागरी भरण्यात आल्या. तसेच दिवंगत स्वातंत्र्यसैनिक, देशसेवेत हुतात्मा झालेले सैनिक तसेच कोरोना काळात निधन झालेल्या व्यक्तींनाही घागर भरून भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात हरिकृष्ण महाराज व राधाकृष्ण देव यांच्या समोर स्वामीनारायण भगवंतांची घागर भरण्यात आली.

या सामूहिक सोहळ्याचे पौरोहित्य राजेंद्र जोशी यांनी केले. यावेळी २१०० घागरींचे पितृ तर्पण मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाश दासजी, स्वामी धर्मकिशोर दासजी, विश्वप्रकाश दासजी, भक्ती प्रियदासजी तसेच मंदिराचे पुजारी स्वयंप्रकाश दासजी, दीपक भगत, मानस भगत, शिवा भगत, विरू भगत यांच्या हस्ते करण्यात आले.

पूजा विधीत हरिभक्त गणेश साफकर व कोमल चौधरी यांचा सहभाग होता. तसेच नाव व गोत्रांचे वाचन मंदिराचे ट्रस्टी नंदकुमार पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिरातील युवक व हरिभक्तांनी मोलाचे सहकार्य केले. यावर्षीप्रमाणेच पुढील वर्षीही अक्षय तृतीयेच्या दिवशी हा सोहळा आयोजित करण्यात येईल, असे आवाहन यावेळी करण्यात आले.