भुसावळ रेल्वे विभागात कर्मचाऱ्यांचा गौरव; संरक्षा व उत्कृष्ट कार्यासाठी रेल्वे व्यवस्थापकांकडून पुरस्कार वितरण :


भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पुनीत अग्रवाल यांनी विभागातील ०६ कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्य पार पाडताना दाखवलेल्या सतर्कतेबद्दल, संभाव्य अपघात टाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आणि गाड्यांच्या सुरक्षित व सुरळीत संचालनात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल मासिक संरक्षा पुरस्कार प्रदान केले. प्रत्येक पुरस्कारामध्ये एक पदक, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम समाविष्ट आहे.

तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते वर्ष २०२५-२६ दरम्यान विविध मापदंड व निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण २३ कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सुरक्षा कार्यप्रदर्शन, गाड्यांची वक्तशीरपणा, प्रवासी तक्रार निवारण तसेच स्थानक व गाड्यांमधील स्वच्छता या महत्त्वपूर्ण बाबींमध्ये सर्वांगीण सुधारणा घडवून आणण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

पुरस्कार वितरित करताना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितले की, कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अशा सतर्कता आणि वचनबद्धतेच्या कृतींमुळे इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.

हा पुरस्कार वितरण समारंभ विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, वसुधारा हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री एम के मीना आणि वरिष्ठ शाखा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.