भुसावळात १५ जूनला पेन्शन अदालत; न्यायालयीन प्रकरणांना प्रवेश नाही

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी १५ जून रोजी सकाळी ११ वाजता डीआरएम कार्यालयात पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा भाग म्हणून ही अदालत घेण्यात येत असून, शासनाच्या निर्देशांनुसार पेन्शनधारकांच्या तक्रारींचे तत्परतेने निराकरण केले जाणार आहे. या अदालतीत केवळ पेन्शनशी संबंधित प्रकरणांचाच विचार केला जाईल.

पॉलिसीविषयक तक्रारी—जसे की कौटुंबिक पेन्शन, नाव समाविष्ट करण्याची प्रकरणे—तसेच न्यायालयीन प्रकरणे स्वीकारली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भुसावळ विभागातून सेवानिवृत्त झालेले आणि पेन्शन किंवा सेटलमेंट देयकांबाबत तक्रारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारींचे अर्ज तीन प्रतीत डीआरएम कार्यालय (कार्मिक), भुसावळ येथे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जामध्ये नाव, पद, भरतीची तारीख, बँक खाते क्रमांक, आयएफएससी क्रमांक आणि तक्रारीचे स्वरूप नमूद करणे आवश्यक आहे. यासोबत पेन्शन पेमेंट ऑर्डर, बँकेची पेन्शन स्लिप, पासबुकची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.