मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत मुक्ताईनगर तालुक्यातून तब्बल ६ लाख ४८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गुटखा साठा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पुर्णाड फाटा ते सुकळी गावादरम्यान राशा वर्डा जवळ सावदा रोडवर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
या कारवाईत अनिकेत शिवाजी सुरवसे (वय ३५, रा. सावरगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) याच्या ताब्यातील वाहनातून २ लाख ४३ हजार ३६० रुपये किमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला व V-1 तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. तसेच ४ लाख रुपये किमतीचे MH-14/DX-1463 क्रमांकाचे वाहन आणि ५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ४८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या पथकाने पार पाडली.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


