भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेने वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून हडपसर ते प्रयागराज दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच साईनगर शिर्डी–बीकानेर विशेष गाडीच्या फेऱ्यांचाही कालावधी वाढवण्यात आला आहे.

हडपसर–प्रयागराज साप्ताहिक विशेष गाडी (क्रमांक 04108) ही 2 एप्रिल 2026 ते 16 जुलै 2026 दरम्यान प्रत्येक गुरुवारी रात्री 10.40 वाजता हडपसरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. परतीची गाडी (क्रमांक 04107) 1 एप्रिल ते 15 जुलै 2026 दरम्यान प्रत्येक बुधवारी सकाळी 10.20 वाजता प्रयागराजहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7.30 वाजता हडपसर येथे येईल. या मार्गावर दौंड, अहमदनगर, मनमाड, भुसावळ , इटारसी, बीना, खजुराहो, बांदा, चित्रकूट धाम आदी प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. एकूण 32 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
दरम्यान, साईनगर शिर्डी–बीकानेर साप्ताहिक विशेष गाडी (क्रमांक 04716/04715) चा कालावधीही वाढवण्यात आला आहे. पूर्वी 29 मार्च 2026 पर्यंत चालणारी ही गाडी आता 12 जुलै 2026 पर्यंत (शिर्डी–बीकानेर) आणि 11 जुलै 2026 पर्यंत (बीकानेर–शिर्डी) चालवली जाणार आहे. एकूण 30 फेऱ्या वाढवण्यात आल्या असून वेळापत्रक, मार्ग आणि थांबे पूर्ववत राहतील.
या विशेष गाड्यांसाठी आरक्षण 28 मार्च 2026 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC Rail Connect संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना RailOne ॲप तसेच NTES ॲपद्वारेही माहिती मिळू शकते.


