भुसावळ विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम; फुकट्या प्रवाशांकडून 2.82 लाखांहून अधिक दंड वसूल

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी भुसावळ रेल्वे विभागाने अनधिकृत व विनातिकीट प्रवासाविरोधात विशेष मोहीम राबवली. दिनांक 25 मार्च 2026 रोजी “फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम” अंतर्गत भुसावळ विभागातील 8 प्रमुख स्थानकांवर व्यापक तपासणी करण्यात आली.

या मोहिमेत भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या स्थानकांचा समावेश होता. नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा, हा मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

मोहिमेत एकूण 55 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 9 रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचारी सहभागी झाले होते. तपासणी दरम्यान 491 प्रकरणे आढळून आली असून त्यातून फुकट्या प्रवाशांकडून एकूण 2,82,770 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय, रेल्वे कायद्याच्या कलम 145 अंतर्गत 3 प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्यातून 2,100 रुपयांचा दंड वसूल झाला. स्थानक परिसरात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या 5 विक्रेत्यांवरही कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

भुसावळ विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा. प्रवाशांनी अधिकृत विक्रेते, स्थानकावरील बुकिंग खिडक्या, एटीव्हीएम किंवा IRCTC संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच मोबाईलवर Rail One ॲप डाउनलोड करूनही तिकिटे आरक्षित करता येतात.

प्रवाशांनी नियमांचे पालन केल्यास गैरसोय आणि दंड टाळता येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.