भुसावळात सफाई कामगाराला कामावरून काढण्याची धमकी:शासकीय कामात अडथळामाजी नगरसेवका विरोधात गुन्हा दाखल: सफाई कामगारांचे कामबंद इशारा;

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये आज मंगळवारी सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे वातावरण तापले. नगरसेविकेच्या भाऊ माजी नगरसेवक यांनी सफाई कर्मचाऱ्याला दमदाटी करत कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्याची घटना येथे घडली. या घटनेच्या निषेधार्थ सफाई कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामबंद आंदोलन पुकारत बाजारपेठ पोलिस स्टेशन गाठले. या दिलेल्या तक्रारीवरून माजी नगरसेवका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .

मिळालेल्या माहितीनुसार, मदन पतरोडिया यांनी तक्रार दिली की , सोमवार, 23 रोजी सकाळी 5.40 वाजता ते शिवाजीनगरात कामगार राजन जेथे व सुनील चेंगट यांच्यासह काम करीत असताना यावेळी समीर कृष्णधन कर हे 7.30 वाजेच्या सुमारास आले व त्यांनी आमच्या वॉर्डात काम करायला सांगितल्यानंतरही येथे का आले म्हणून आमच्या वॉर्डात काम कर, असे बजावले. आपण त्यांना येथील काम आटोपल्यानंतर कामासाठी येतो, असे सांगितल्याने धोनीi आपल्या अंगावर धावून आले व त्यांनी तुम्ही फुकटचा पगार घेतात, काहीच काम करत नाही, असे म्हटल्याने आपण त्यांना पोलिसात तक्रार करू, असे सांगितल्याने त्यांनी शिविगाळ करीत आपली बहिण नगरसेविका असल्याने मुकादमी काढून टाकण्याची धमकी देत शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद केले आणि आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली.

दरम्यान मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते . पोलिस ठाण्याबाहेर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. “जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत काम सुरू करणार नाही,” असा ठाम इशारा कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी दिला. तसेच, यापुढे कोणत्याही नगरसेवक किंवा त्यांच्या संबंधितांकडून होणारी अरेरावी व दमदाटी सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या अचानक घडलेल्या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यास गुन्हा नोंद झाली असून पोलिसांनी धोनी यांना नोटीस बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.