भुसावळ (प्रतिनिधी) :
महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची रेल्वेमार्गे तस्करी करण्याचा प्रयत्न भुसावळ येथे उधळून लावण्यात आला. लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त कारवाईत २ लाख ५३ हजार ५०६ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

ता. २३ मार्च २०२६ रोजी संबंधित पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, ११०५८ अप पठाणकोट एक्सप्रेसमधून गुटखा सदृश माल आणला जात आहे. या माहितीच्या आधारे सायंकाळी सुमारे सहा वाजता गाडी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर दाखल होताच तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान जनरल कोचमध्ये एक संशयित इसम आढळून आला. त्याच्याकडे एकूण १७ बॅग सापडल्या. या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आढळून आला.
प्राथमिक चौकशीत संबंधित आरोपी हा बऱ्हाणपूर येथील असून, हा संपूर्ण माल बऱ्हाणपूर येथून आणल्याची कबुली त्याने दिली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.


